Nero’s Guest

अनेक वर्षापूर्वी रोममध्ये निरो नावाचा राजा होता. अत्यंत निर्दयी, दुष्ट, खुद्पसंत, विलासी म्हणून तो प्रसिद्ध होता. रोमच्या इतिहासातला सगळ्यात भयानक दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याविना मरत होते, पैसे-सोन्या ऐवजी लोक अन्नाची चोरी करायला लागले होते. अनेकांचा जीव जात होता आणि त्याचवेळी निरोने त्याच्या राजवाड्यात अलिशान मेजवानीचे आयोजन केले. रोममधल्या सगळ्या श्रीमंत, उद्योजक (आजच्या भाषेत page ३ personalities) या पार्टीला आमंत्रित होत्या. बाहेर एक वेळचे अन्न मिळत नव्हते पण इथे मात्र सगळ्या गोष्टी वाया जात होत्या. सगळे होते मात्र रोषणाई नव्हती. निरोने आदेश दिला. जेल मधल्या सगळ्यांना बाहेर काढा आणि मोठ्या लाकडाला बांधा. जेलमध्ये लहान, मोठे, महिला, वृद्ध सगळे होते. पैसे नाही पण अन्नाची-पाण्याची चोरी करणारी हि निष्पाप मनसे. निरोने आदेश दिला या सगळ्या लाकडाला बांधून जिवंत जाळून टाका. राजाचीच आज्ञा…लगेच त्याचे पालन केले गेले. सगळ्या लोकांना जिवंत जाळण्यात आले. आणि त्याच्या रोषणाईत लोकांनी मेजवानीचा आनंद(?) घेतला.

प्रश्न हा नाहीच कि निरो कोण होता? तो मूर्ख, निर्दयी होताच. पण खरा प्रश्न हा आहे कि निरो कडे आलेले ते पाहुणे कोण होते?  Who were Nero’s Guest? कोण होती ती लोक कि ज्यांनी लोक जिवंत जाळली जात असताना त्याकडे दुर्लक्ष करत, स्वताच्याच मस्तीत गुंग होती. अनेक वर्ष शेतकरी आत्महत्यांवर काम करणारे पी. साईनाथ म्हणतात,” अनेक वर्ष शेतकरी आत्महत्यांवर काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले कि निरो कडे आलेले ते लोक कोण होते. तुम्ही, मी आणि ती सगळी लोक जि आजूबाजूच्या दुखः न लक्षात घेता स्वताच्या मस्तीत धुंद असतात ती सगळी Nero’s Guest होती.”

महराष्ट्रात या वर्षी १९७२ नंतरचा सगळ्यात मोठ्या दुष्काळाच संकट आहे. पाऊसाची चातकासारखी वाट पाहून शेतकरी शेवटी स्वताचा जीव देतोय. पण शहरातील लोकांना मात्र त्याचे काहीच नाही असे दिसते.

आज गोकुळाष्टमी. सगळीकडे दही हंडीची धूम सुरु आहे. पण यावर्षी दुष्काळ लक्षात घेऊन मुंबईत अनेक मंडळांनी दहीहंडी रद्द केली आणि आलेला पैसातून मराठवाड्यात पाण्याचे tanker पाठवले. जळगावात देखील अनेक दहीहंड्यानि पाण्याचा वापर टाळून कोरडी दहीहंडी साजरी केली. पण महाबळमध्ये मात्र ड्रम भरून भरून पाणी ओतले जात होते. DJच्या तालावर सगळ विसरून लोक पाणी वायाघालवत होती. पाण्याचे ओघळ संपूर्ण रस्त्यावर पसरलेलं होते. DJच्या धुंदीत,मस्तीत गुंग लोकांना शेतकऱ्यांचे दुखः दिसत नाही का? ज्यांना ओंजळभर पाणी मिळवण्यासाठी मैलोनमैल चालणाऱ्या महिला, स्वताची शाळा सोडून tanker मागे बादली घेऊन पळणारी मुल दिसतच नाहीत? ओघळलेल्या पाण्याच्या डबक्यात यांना झाडाला लटकून जीव देणाऱ्या शेतकऱ्याच प्रतिबिंब कस दिसत नाही? शेतकरी कर्जाने नाही तर प्रेमभंगाने आत्महत्या करतात असे म्हणल कि प्रश्नच संपतो. आपल्याला पाणी मिळतंय ना मग उडवा. धुवा आपल्या गाड्या आणि compound, लोक मारतायेत तर मरू द्यात. आपल्याला काय? पाणीसंपल तरी शहराला पाणी मिळणारच आहे ना? ते पाणीटंचाई त्याची झळ हि सगळी ग्रामीण भागाला. आपल्याला कुठे डब्बे घेऊन tankerच्या मागे धावायचय……

पाण्याविना लोक मरत असताना आपण काही करणार आहोत कि नाही? कि पी.साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे निरोच्या मेजवानीत आलेली ती लोक आपणच Nero’s Guest?

Advertisements

    जिथे शिक्षणापेक्षा पत्ते जास्त महत्वाचे असतात.

 कचरा वेचक तसेच वंचित मुला/मुलींमध्ये शिक्षणाविषयी आवड आणि गोडी निर्माण व्हावी म्हणून आम्ही जळगावातील तांबापुरा परिसरातील मरिमाता मंदिराच्या परिसरात Evening Learning Center सुरु केले. सुरुवातीपासूनच या मंदिराच्या परिसरात मोकळ्या जागेत हे केंद्र सुरु आहे. जिथे सुमारे ३५ मुले/मुली दररोज संध्याकाळी शिकायला येतात. आज दीड वर्ष झाले पण अजूनही आम्हाला त्या परिसरात जागा मिळालेली नाही.

या मंदिराच्या परिसरात आंगणवाडीसाठी म्हणून बांधलेली एक खोली आहे. आंगणवाडी तर तिथे चालत नाही पण तिथल्याच एका ठेकेदाराने स्वताचे बांधकामाचे सामान तिथे ठेवेलेले आहे. या खोलीच्या गच्चीवर दररोज पत्त्याचा डाव रंगलेला असतो. ऊन पावसात आम्हाला center बंद ठेवावे लागते पण पत्त्याचा डाव बंद होत नाही तर तो त्या खोलीत देखील तितकाच रंगतो.

ज्याचे हे सामान आहे त्याला अनेकदा आम्ही विनंती केली, या संदर्भात आम्ही तेथील नगरसेवकांना अनेकवेळा विनंती केली मात्र त्यांनी देखील या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. ती खोली रिकामी करून आम्हाला देण्यास कोणतेही मदत केली नाही.

परवा १५ ऑगस्टला सकाळी मंदिराच्या परिसरात आमची सगळी कचरावेचक लेकर अत्यंत उत्साहाने राष्ट्रगीत म्हणत होती तर आत खोलीत तेवढ्याच उत्साहाने पत्ते खेळणे सुरु होते.

मुलांच्या शिक्षणापेक्षाही या लोकांना आणि नगरसेवकालादेखील पत्ते जास्त महत्वाचे वाटतात. शिक्षण नाही तर व्यसने, रोगराई, बेकायदेशीर कामे यातच आमच्या लोकांना धन्यता वाटते कारण याने निरुपयोगी, व्यसनाधीन पिढी निर्माण होते. पैसे फेकले हि तुम्हाला मत देणारी. त्यांच्या भविष्याविषयी कोणालाही कणव वाटत नाही, त्यांनी शिकावे हे वाटणे तर आणखीनच दूर. कारण माणूस शिकला कि सद्य परिस्थितीतले दोष शोधायला लागतो, तो प्रश्न विचारायला लागतो आणि नेमके हेच कोणालाही नकोय.

आज जळगावातील व जळगावच्या बाहेरील अनेक लोकांनी आम्हाला या मुलांसाठी पुस्तके, खेळणी दिलेली आहेत याचे एक कायमस्वरूपी वाचनालय येथे सुरु करावे ज्यामुळे हि मुल/मुली इकडे तिकडे न फिरता तिथे खेळत/शिकत बसतील.अनेकजण संगणक देण्यास तयार आहे. असे झाले तर आमच्या मुला/मुलींसाठी एक सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याची आमची इच्छा आहे. आज या केंद्राला आर्थिक तसेच वस्तूंच्या स्वरुपात मदत करण्यास अनेक जण तयार आहेत, पण वस्तू ठेवायला जागाच नसल्याने आम्हाला त्या सगळ्यांना आत्ता काहीच मदत नको असे सांगावे लागत आहे. बंदिस्त खोली मिळत नाही तोपर्यंत या कोणत्याही गोष्टी घडणे शक्य नाही. पण जिथे लोकांना शिक्षणापेक्षा पत्ते खेळणे महत्वाचे वाटते तिथे या गोष्टी घडतील तरी कश्या?

आपण संवेदनशीलता हरवत चाललो आहोत का?

१९९४ साली सुदान देशात प्रचंड दुष्काळ पडलेला असताना अन्नावाचून त्या चिमूरद्याचा जीव जाईल व आपल्या अन्न मिळेल ह्या आशेने त्याच्याकडे बघत असलेले गिधाड. ‘केविन कार्टर’ या अत्यंत प्रसिद्ध अश्या फोटोग्राफरचे अनेक वर्षापूर्वी पुलित्झर पुरस्काराने सन्मानित हे चित्र. पुढे काही महिन्यांनी “चित्रातील मुलाचे पुढे काय झाल? तो जगला कि मेला?” असा प्रश्न एकाने ह्या चित्रकाराला विचारला. ह्या प्रश्नाने तो एकदम अस्वस्थ झाला. AwardPhotoकारण हा विचार त्याने पूर्वी कधी केलाच नव्हता. फोटो नंतर तो जगला कि मेला हे बघायला तो थांबलाच नव्हता. त्याचे काम झाल्यावर तो लगेच निघून आला होता. “त्या मुलाचे काय झाले? ह्या प्रश्नाने त्याला इतके छळले कि तीन महिन्यातच त्याने आत्महत्या केली.
२० वर्षापूर्वीच एका छायाचित्रकाराने आपण इतके असंवेदनशील कसे हा विचार सहन न झाल्याने आत्महत्या केली.
आजच्या एका वृत्तपत्रात १४ महिने स्वताचा पगार न झालेल्या शिक्षकाने महानगरपालिकेत महासभा सुरु असताना निषेध नोंदवत विष प्राशन केल्याचे सविस्तर वृत्त फोटोग्राफ्स सकट प्रकाशित झाले आहे. फोटोंचा क्रम असा १. शिक्षक हातात विषाची बाटली धरून निषेध करताना. २. विष प्राशन करताना. ३. त्यानंतर त्याच्या तोंडाला आलेला फेस. ४. काही वेळाने तो खाली पडला ५. इतर शिक्षक त्याला उचलून घेऊन जाताना.
हि बातमी पाहिल्यानंतर मला काही प्रश्न पडले. ह्या शिक्षकाच्या बाजूला काही लोक उभे असल्याचे दिसत आहे. त्यांनी त्याच्या हातून विषाची बाटली काढून घेण्याचा प्रयत्न का नाही केला? ज्या फोटोग्राफरने हि संपूर्ण घटना त्याच्या कॅमेरात कैद केली त्यांने देखील त्याच्या हातून बाटली काढून घेण्याचा प्रयत्न का नाही केला?
इतर वृत्तपत्रात देखील हि बातमी आली आहे, म्हणजेच इतर अनेक पत्रकार तेथे हजार होते त्यांनी देखील त्याला वाचवण्याचा, त्याच्या हातून विषाची बाटली काढण्याचा प्रयत्न का नाही केला? संपूर्ण घटना मानवी असंवेदनशिलतेचा कळस गाठणारी आहे.
आपल्या सहकारी शिक्षकाने आत्म्हत्तेचा प्रयत्न केल्याचे कळल्यानंतर शिक्षकांनी त्याला उचलून रिक्षात टाकले व सिव्हील हॉस्पिटलला दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे कळते. समोरच्या व्यक्तीचा जीव जात असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता आपल्या कॅमेरात त्या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यातच आज लोक धन्यता मानतात, ह्याची अनेक उदाहरणे आपल्याला गेल्या काही काळात बघायला मिळाली आहेत.
एखाद्या व्यक्तीचा जीव जात असताना फोटो काढायचे, रस्त्यावर अक्सिडेंत होतानाची विडीओ काढायचा पण अक्सीडेंत झालेल्या व्यक्तीला मदत करायला मात्र थांबायचं नाही. जीव गेलेल्या व्यक्तीच्या नावे candle march काढायचा पण तिचा जीव जात असताना मात्र त्याचे फोटो काढण्यातच धन्यता मानावी ह्या सगळ्या घटनेत आपण संवेदनशीलता संवेदनशीलता हरवत तर नाहीये ना हा प्रश्न मात्र राहतो…

The Myths of Sisyphus

७०च्या दशकात ‘The Myths of Sisyphus’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. यात Sisyphusच्या काल्पनिक कथा दिलेल्या होत्या. या Sisyphusला एक शिक्षा देण्यात आलेली असते. त्या अंतर्गत त्याला दररोज एक मोठा दगड ढकलत-ढकलत डोंगरावर घेऊन जायचा असतो. दररोज भल्या पहाटे Sisyphus हा दगड डोंगरावर ढकलायला सुरुवात करत असतो. दुपार होईपर्यंत Sisyphus ज्यावेळी डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो त्याचवेळी त्याच्या शिक्षेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात होत असते. ज्या क्षणी Sisyphus दगडावरचा हात सोडतो त्याचक्षणी तो दगड पुन्हा एकदा त्या डोंगरावरून घरंगळत पायथ्याशी येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी Sisyphus पुन्हा एकदा दगड लोटायला सुरुवात करतो. कधीही अंत नसलेली अशी शिक्षा होती.

हि काल्पनिक कथा असली तर आजच्या काळात आपल्या अवती-भोवती असे अनेक Sisyphus प्रत्यक्ष आपल्या शहरात,गल्लीत फिरत असतात, फक्त आपले त्यांच्याकडे लक्ष नसते इतकेच आणि आपण त्यांना Sisyphus म्हणून नाही तर कचरा वेचणारे म्हणून ओळखतो. हातावर पोट असलेली हि लोकं.

ही ती लोकं आहेत जी खांद्याला एक पिशवी अडकवून भल्या पहाटे घरातून बाहेर पडतात. दिवसभर शहरातील विविध भागात, रस्त्यांवरून, कचरापेटीतला कचरा तुडवत फिरतात. जमवलेला हा कचरा अत्यंत कमी दरात व्यावसायिकांना विकतात आणि मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर त्या दिवसापुरती जेवणाची सोय करतात आणि झोपी जातात दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे खांद्यावर पिशवी अडकवून कचरा शोधायला बाहेर पडण्यासाठी.

कचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात उपेक्षित गट म्हणून या गटाकडे बघितल जातं. शहरातील लोकांना त्यांचे घर, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसे घेणे-देणे नसते. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटते पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिट देखील सहन करू शकत नाही अश्या घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न मात्र पडत नाहीत.

कचरा वेचकांकडून विकत घेतलेल्या कचरा उच्च दरात भंगारवाले या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना विकतात. हे कारखाने त्या मालावर प्रक्रीया करून पुनरुत्पादित केलेला माल आणखी चढ्या किमतीत विकतात. हे व्यावसायिक या कचऱ्यावर मालेमाल तर होतात मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून जीवन जगणारा हा कष्टकरी समाज मात्र नेहमी उपेक्षितच राहतो. अशिक्षितता, सतत अस्वच्छ वातावरणात राहण्याने निर्माण होणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न, अपुरा पैसा आणि व्यसने यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना असंख्य समस्यांना तोंड सतत तोंड देत राहतो.

‘वर्धिष्णू सोशल रिसर्च & डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेच्या माध्यमातून ऑगस्ट-सप्टेंबर, २०१३ मध्ये घेतलेल्या कचरा वेचकांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात देखील हीच बाब समोर आली होती. या सर्वेक्षणात मुलाखत घेतलेल्या ३९६ लोकांपैकी २९६ अशिक्षित होती. तर ६०% हून अधिक लोकांना व्यसन होते. महत्वाची बाब म्हणजे यात ११४ लहान म्हणजे वय वर्षे १४खालील मुल/मुली होती. हि सगळे लोक त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% हून अधिक रक्कम व्यसनावर खर्च करतात अशी माहिती आमच्या समोर आली.

शाळेत शिक्षकांकडून मानहानीकारक वागणूक दिली जाते, त्यांच्या भावनांना समजून न घेता सतत अमानुष मारहाण केली जाते. ‘मास्तरने इतक्या जोरात कानाखाली मारली कि आजबी कानामंदी आवाज घुमतो’ असे अनेक जणांकडून ऐकायला मिळेल. शाळेत मार मिळतो म्हणून शाळा सोडल्याची अनेक उदाहरणे आम्हाला आज दिसतात.

सतत घाणीत वावरणे. पुरेशी स्वच्छता न पाळणे. तसेच कचऱ्यात हात टाकताना कोणत्याही साधनंचा वापर न केल्याने अनेक लोकांना हात पायाला काच, पत्रा यासारख्या धारदार वस्तू लागून जखमा होतात तर पावसाळ्यात साप देखील चावतात. पावसाळ्यात साप चावून मेल्याची देखील काही उदाहरणे आहेत.

जखमांसोबतच लहान वयातच दमा, चक्कर येणे, दुर्गंधीचा त्रास होणे यासारख्या समस्यांना या लोकांना तोंड द्यावे लागते.

आजारी पडल्यावर देखील बहुसंख्य लोकांचा कल हा औषधे न घेता तसेच आला दिवस ढकलण्यावर असतो. याचे मुख्य कारण नाजूक आर्थिक परिस्थिती हे सांगितले जाते. तर या खालोखाल दवाखाना आणि डॉक्टरची भीती हे देखील उपचार न घेण्याचे कारण सांगितले जाते. तसेच ताप, अशक्तपणा यांसारख्या आजारावर बाबा, भगत यांसारख्या अप्रशिक्षित व्यक्तींकडे जाऊन उपचार घेतले जातात.

एक प्रकारे हि सगळी लोक शहरातील कचरा/घाण साफ करण्याचेच काम करत असतात पण याकडे शासकीय यंत्रणा आणि जनता सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कोठेही चोरी झाली कि संशयाचे पहिले बोट यांच्याकडेच दाखवली जाते. पोलिसांच्या / ठेकेदारांच्या अत्याचाराला यांना सतत तोंड द्यावे लागते. पहाटेच्या अंधारात कचरा वेचायला बाहेर पडलेल्या स्त्रीयांना पुरुषांच्या विखारी आणि वासनेने बरबटलेल्या नजरांना तोंड द्यावे लागते.

अशिक्षितता, अल्प उत्पन्न, व्यसनांवर होणारा भरमसाट खर्च, शासनाचे दुर्लक्ष, वाढती महागाई, वाढता खर्च आणि तो भागवण्यासाठी सतत काढलेले कर्ज याच्या ओझ्याखाली हा समाज दाबला गेला आहे. विविध भागात विखुरला गेलेल्या ह्या समाजाला संघटीत होऊन स्वताच्या हक्कासाठी लढावे, संघर्ष करावा अशी गरज देखील त्याला वाटत नाही. रोजचा खर्च निघेल एवढ ठेवायचं आणि बाकी पैसा व्यसनांवर खर्च करायचा एवढ आणि एवढच आयुष्य आज या समाजच आहे.

अगदी २६ नोवेंबरला जेव्हा संपूर्ण देश भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत होता त्याच दिवशी ३ सफाई कामगार नाल्यात सफाई करत असताना गुदमरून मेले. मात्र कामगारांसाठी कुठलेही कॅण्डल मार्च निघणार नाहीत, यांच्या घरच्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत कि त्यांना कोणताही मोबदला मिळणार नाहीत. हा प्रश्न उपस्थित करताना कोठेही देशासाठी प्राण देणाऱ्या भारतीय वीर जवनाप्रती आदर व्यक्त करतानाच भारतीय समाजच दुटप्पी वागण्यावर मात्र बोट ठेवण भाग आहे. काय गरज होती त्यांना नाल्यात उतरण्याची? कोणी सांगितल होत? का उतरले होते ते त्या घाणीत? ते उतरले होते मी आणि तुम्ही केलेली घाण साफ करायला. आणि मग जर हे खर असेल तर त्यांच्या मृत्यूला जवाबदार कोण?

चोकलेट खाल्लं फेक कागद रस्त्यावर, गुटखा खाल्ला मार रस्त्यावर पिचकाऱ्या, पाणी पिल फेक पाऊच रस्त्यावर, भेल खाल्ली फेक कागद रस्त्यावर, फिरायला गेलो करा घाण. कोणीतरी ती उचलायला आहेच. आपण केलेली घाण साफ करण्यासाठी कोणीतरी आहे हि भावना जोपर्यंत मनातून निघत नाही तोपर्यंत रस्त्यावर दिसणारा कचरा कमी होणार आणि कि सफाई कामगारांचे प्रश्न.

याबाबतीत खुप सुंदर गोष्ट आहे. एका घरात एक लहान मुलगा त्याच्या आईला सांगायला येतो कि, ”आई बाहेर कचरावाला आलाय”. यावर त्यांची आई उत्तर देते,” बेटा कचरा तर आपण करतो ते तर सफाई करणारे आहेत”. जोपर्यंत सगळ्या घरातून हे संभाषण ऐकू येत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणे शक्य नाही.

उच्चभ्रू समाज अथवा इतर समाज आपल्याला सामावून घेणार नाहीत असा न्यूनगंड या समाजात खूप खोलवर रुजलेला आहे. आर्थिक विषमतेने जमीन-अस्मानाच अंतर निर्माण झालेलं आहे. जगण्याचे साधन कितीही घाण असले तरी त्याला पर्याय दिल्याशिवाय त्याचा त्याग करणे शक्य नाही. अश्या परिस्थितीत समाजाची या व्यवसायातून सुटका होऊन त्याचं सन्माननीय विकसनशील पुनर्वसन कस होईल याच उत्तर शोधले तरच यांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

पाकिस्तान – इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी

भाग २

भारत आणि पाकिस्तानमधल्या सामान्य जनतेला युद्ध नाही तर मैत्री हवीये. तसेच दोन्ही देशातील जनतेच्या मनातील एकमेकांबद्दलचे असलेले संशय, गैरसमज दूर करायचे असतील तर त्यांनी एकमेकांना भेटायला हवे.  दोन्ही देशातील शांतता-लोकशाही सुधृड करण्यासाठी चर्चा करायला हवी या उद्दिष्टाने दोन्ही देशातील सामाजिक-मानवी हक्क कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलावंत यांनी एकत्र येऊन १९९३ साली पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी (PIPFPD) या फोरमची स्थापन केली. याचे एक chapter भारतात तर एक पाकिस्तानात स्थापन करण्यात आले.  १९९२ला झालेला बाबरीचा विध्वंस, मुंबई बॉम्बस्फोट यामुळे भारतातील सामाजिक जीवन ढवळून निघालेले होते. धार्मिक सलोख्यावर याचा खूप मोठा परिमाण झाला होता. अश्या कठीण काळात फोरम ची स्थापना झाली.

भारत आणि पाकिस्तानचे एकमेकांच्या देशाला भेट देण्यासाठीचे Visa चे नियम अत्यंत कठोर आहेत. यामुळे सामान्य भारतीय नागरिकाला पाकिस्तानचा आणि तसेच सामान्य पाकिस्तानी नागरिकाला भारताचा Visa मिळणे खूप कठीण जाते. फोरमने मात्र दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांना भेटता यावे, बोलता यावे म्हणून Joint-Conventions घेण्याचा निर्णय घेतला. अशी Conventions एक वर्ष भारतात  तर एक वर्ष पाकिस्तानात घ्यायचे असे ठरवले गेले. यामुळे एकदम १५०-२०० भारतीय तसेच पाकिस्तानी नागरिकांना Visa मिळून त्यांना एकमेकांच्या देशाला भेटी देणे शक्य होणार होते आणि अश्या तर्हेने २४-२५ फेब्रुवारी, १९९५ ला नवी दिल्ली येथे पहिले Joint-Convention पार पडले. यावेळी पाकिस्तान chapter कडे १३५ इच्छुकांचे अर्ज आले पण Visa च्या मर्यादेमुळे १०० पाकिस्तानी नागरिकांना Visa देण्यात आला. यानंतरचे पुढचे Joint-Convention लगेचच १०-११ नोवेंबर, १९९५ ला लाहोर, येथे घेण्यात आले ज्याला भारतातून ७५ नागरिकांनी हजेरी लावली. (जय भीम कॉम्रेड, राम के नाम सारख्या documentaries चे दिग्दर्शक आनंद पटवर्धन हे याच Joint-Convention ला पाकिस्तानात गेले होते. याचा उल्लेख त्यांच्या War & Peace या documentry मध्ये दिसेल.)

यानंतर १९९८ ला पुन्हा दोन्ही देशात, २००० ला भारतात, २००३ ला कराची, २००५ ला भारतात अशी Joint-Conventions घेण्यात आली. शेवटचे Joint-Convention २०११ साली अलाहाबादला घेण्यात आले. मध्यंतरीच्या काळात भारत आणि पाकिस्तान मधील युद्धामुळे Joint-Conventions घेणे शक्य झाले नाही. या काळात दोन्ही देशांनी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा थांबवल्या होत्या. मात्र फोरमने याचा नेहमीच विरोध केला आहे. लोकशाहीत सगळे प्रश्न चर्चेने सोडवायचे असतात आणि यामुळे दोन्ही देशांनी त्यांच्यातील चर्चा थांबवू नये यासाठी फोरमने नेहमी प्रयत्न केले.

गेल्या २० वर्षात फोरमचे काम विस्तारले. आज भारतात पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, जम्मू व काश्मीर, मध्य प्रदेश या राज्यात फोरमचे chapters सुरु झालेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नासिक, जळगाव येथे फोरमचे chapters आहेत, तर पाकिस्तानात कराची, लाहोर सह अन्य शहरात chapters आहेत.

फोरम दोन्ही देशातील नागरिकांची विविध कारणांनी भेट होत राहावी म्हणून प्रयत्न करत आहे. सुरुवातीला जनतेचा संवाद घडवून आणणाच्या उद्देशाने सुरु झालेल्या फोरमने नंतर इतर प्रश्नांवर देखील काम करण्यास सुरु केले. आज फोरम मच्छीमारांच्या अटकेचा प्रश्न, सियाचीन येथील युद्धबंदीचा प्रश्न, काश्मीर मधील तसेच सरहद्दीवर राहणाऱ्या लोकांच्या मानवी अधिकारांबाबत लढा देत आहे. यांपैकी प्रत्तेक प्रश्नांची आपण सविस्तर ओळख करून घेऊ:

मच्छीमारांच्या अटकेचा प्रश्न:

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना मोठा सागर किनारा लाभलेला आहे. या सागर किनारी राहणाऱ्या लोकांचा प्रमुख रोजगार हा मच्छीमारी हा आहे. जमिनीवर दोन्ही देशांच्या सरहद्दीवर तारांचे कुंपण किंवा तत्सम गोष्टीने देशांच्या सीमा अधोरेखित केल्या जातात मात्र समुद्रात कुठे एका देशाची हद्द संपते आणि दुसऱ्या देशाची हद्द सुरु होते हे कळत नाही. याचसोबत सागरी किनाऱ्यावर झालेल्या प्रचंड Industrialisation मुळे किनाऱ्यानजदीक मासे मिळत नाहीत यामुळे मच्छीमार खोल समुद्रात शिरत जातात आणि नकळत देशाची हद्द ओलांडतात. असे मच्छीमार जर कोस्टल गार्ड्सच्या नजरेस पडले तर लगेचच पकडले जातात. बऱ्याचदा तर त्यांना हे माहितीच नसते कि ते स्वतःच्या देशाची हद्द ओलांडून दुसऱ्या देशात आले आहेत.

भारत आणि पाकिस्तानातील मच्छीमारांसोबत देखील असेच होत आहे. याची सुरुवात फाळणी पासून झाली होती मात्र १९९० साली या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले ज्यावेळी दोन्ही देशांकडे एकमेकांचे १००० हून अधिक मच्छीमार अटकेत होते. प्रेमजीभाई कोठारी यांनी National Fisherworker’s Forum (NFF),Pakistan Fisherfolk Forum (PFF)  व PIPFPD च्या माध्यमातून  सर्वप्रथम या प्रश्नाला वाचा फोडली. त्यांनी MSA कडून पकडल्या गेलेल्या तसेच हरवले असल्याची नोंद असणाऱ्या मच्छीमारांची यादी तयार केली व ती गुजरात सरकारला सदर केली यानंतर सरकारने सर्व बोटींवर GPS लावण्याचा निर्णय घेतला मात्र मच्छीमारांच्या अटकेचा/सुटकेचा प्रश्न मात्र यातून सुटला नाही.

प्रेमजीभाई नंतर हरेक्रीष्णा देबनाथ यांनी NFFची २००८ साली मच्छीमार अधिकार यात्रा काढून या प्रश्नांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी गुजरात मधील समुद्र किनार्यावरील Thermal Power Plants, chemical industries, tourism, industrial units यामुळे समुद्राची झालेली अपिरीमित हानी आणि यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रात जावे लागणे याची करणे विषद केली.

२०१२ सालच्या National Fishworker’s Forum (NFF)च्या एका report नुसार ३४२ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या कराची येथील माहीर जेल मध्ये होते तर पाकिस्ताचे १५९ मच्छीमार भारतीय जेल मध्ये होते. यांपैकी बहुतांश मच्छीमार हे १० वर्षाहून अधिक काळ अटकेत आहेत.

ज्यावेळी मच्छीमारांना अटक होते त्यावेळी त्यांचा बोटी देखील ताब्यात घेतल्या जातात, सरकारी आकडेवारीनुसार भारताकडे पाकिस्तानच्या सुमारे २०० बोटी आहेत तर पाकिस्तानकडे भारताच्या ७६५ बोटी आहेत. एका बोटीवर सरासरी १०० माणसे काम करत असतात. सगळ्या भारतीय बोटी या गुजरात आणि दिऊ मधील मच्छीमारांच्या असून यापैकी एकही बोट मच्चिमार व्यवसायात असलेल्या मोठ्या कंपन्यांची नाही हे विशेष.

यानंतर दोन्ही देशांकडून मच्छीमारांसादर्भात माहिती गोळा करणे सुरु झाले. देबनाथ यांच्या निधनानंतर नंतर भारतीय पत्रकार जतीन देसाई यांनी या प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली. PIPFPD व Pakistan Institute for Labour Education and Research (PILER)च्या मदतीने त्यांनी अटकेत असलेल्या मच्छीमारांची आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली. सुप्रीम कोर्टात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली. दोन्ही देशांनी एकत्र येऊन अटक झालेल्या मच्छीमारांविरोधात चालणाऱ्या केसेस निकाल लवकर लागून निर्दोष मच्छीम्रारांची लवकर सुटका व्हावी म्हणून Joint-Tribunal स्थापन केला गेला ज्याला भारतातील तसेच पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. या समितीने भारतातील व पाकिस्तानातील कारागृहांना भेटी देऊन मच्छीमारांची आकडेवारी गोळा करायला सुरुवात केली गेली. याच्या आधी जमा करण्यात आलेल्या आकडेवारींमध्ये समुद्रात हरवलेले अशी नोंद असलेल्या मच्छीमारांची देखील माहिती होती मात्र पहिल्यांदाच प्रत्यक्षात कारागृहात असलेल्या मच्छीमारांची माहिती गोळा करण्यात आली. पाकिस्तानने अटक केलेल्या सगळ्या मच्छीमारांना माहीर जिल्हा कारागृह, काराची येथे ठेवलेले होते मात्र भारतात गुजरात सरकारने सगळ्या मच्छीमारांना साबरमती, राजकोट सह अन्य कारागृहात ठेवलेले होते यामुळे हि नोंद घेणे खूप कठीण गेले.

या सगळ्यात मच्छीमारांची अटकेचे चक्र थांबावे म्हणून PIPFPD, PILER खालील मागण्या करत आहेत.

  • भारत व पाकिस्तान सरकारने वादग्रस्त Sir Creec Line वर कायमचे उत्तर शोधले जावे.
  • दोन्ही देशांच्या सागरी हद्दीवरील काही भाग हा Joint Fishing Zone म्हणून जाहीर करावा या भागात दोन्ही देशातील मच्छीमारांना मासेमारी करायची मोकळीक द्यावी.
  • अटक जरी समुद्रात होत असली तरी मच्छीमारांची सुटका वाघा बोर्डर वरून केली जाते. मात्र जप्त केलेल्या बोटी परत केल्या जात नाहीत यामुळे सुटका झाली तरी चरितार्थ चालवण्याचे एकमेव साधन मच्छीमारांकडून हिरावून घेतले जाते. अनेकांनी कर्ज काढून बोटी घेतलेल्या असतात ज्याचे नियमित हप्ते सुरूच असतात. यामुळे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडतात असे होऊ नये म्हणून बोटी देखील सोडण्यात याव्यात यासाठी PIPFPD प्रयत्नशील आहे.
  • अनेक मच्छीमारांचा तुरुंगात मृत्यू होतो मात्र त्यांच्या कुटुंबियांना शव ताब्यात घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. काही प्रसंगांमध्ये तर ३/४ महिन्यांनी शव परत घरी आले आहेत. असे होऊ नये व किमान मृत व्यक्तीचे शव तरी लवकर घरी पाठवण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मात्र NFF, PFF, PIPFPD, PILER यांमुळे मच्छीमारांच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे. मच्छीमार संघटीत झाले आहेत व एकत्रित स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. परिस्थिती हळूहळू सुधारायला सुरुवात झाली. अनेक प्रसंगात goodwill gesture म्हणून आता दोन्ही देश मच्छीमारांची सुटका करत आहेत. मात्र तरीही मच्छीमारांच्या अटकेचे प्रमाण काही कमी झालेले नाही. ज्या ज्या वेळी Line of Control वर तणावाचे वातावरण अथवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्या प्रत्येक वेळी मच्छीमारांच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दोन्ही देश एकत्र येऊन जोपर्यंत मतभेद संपवत नाहीत तोपर्यंत मच्छीमारांना या सगळ्या प्रश्नांना सामोरे जावेच लागणार आहे.

संदर्भ:

  • pipfpd.org
  • Fishing in troubled waters published by Programme for Social Action (PSA), 2013
  • पाकिस्तान दुसरा पहलू published by PIPFPD, 1995
  • Reports of PIPFPD’s 7th Joint Conventions held in New Delhi, India during 25th -27th November, 2007

प्रयोगशील एक वर्ष…..

शिक्षण हा समाजाचा पाया मानला जातो. मात्र भारतीय समाज शिक्षणाविषयी फारसा सजग दिसत नाही आणि काही वेळा आर्थिक-सामाजिक परिस्थिती त्याला शिक्षणापासून दूर ठेऊ पहाते. वर्धिष्णू- सोशल रिसर्च & डेव्हलपमेंट सोसायटी ने ऑगस्ट-सप्टेंबर, २०१३ या काळात घेतलेल्या कचरा वेचकांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने पुढे आली.
मुळातच शहरातील लोकांना त्यांचे घर, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसे घेणे-देणे नसते. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटते पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिट देखील सहन करू शकत नाही अश्या घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न मात्र पडत नाहीत. अशिक्षितता, सतत अस्वच्छ वातावरणात राहण्याने निर्माण होणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न, अपुरा पैसा आणि व्यसने यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
कचरा वेचकांना या परिस्थितीतून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर सर्वप्रथम त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजून घ्यायला हवी. याच उद्दिष्टाने आम्ही वर्धिष्णूच्या माध्यमातून जळगावातील महानगरपालिका कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कचरा वेचून आयुष्य जगणाऱ्या लोकांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले. यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न तसेच व्यसने व रोजगार या मुद्द्यांवर काम करण्यास सुरवात झाली. याअंतर्गत कचरा वेचकांची तसेच एकूण असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची जास्त लोकसंख्या असलेल्या जळगावातील तांबापुरा वस्तीतील भिलाटी या भागात मुलां/मुलीसाठी आम्ही सायं-शाळा सुरु केली.
२ जानेवारी, २०१५ ला या सायं-शाळेला एक वर्ष पूर्ण होत आहे. १५ मुला/मुलींपासून सुरु झालेल्या या शाळेत २ केंद्रांमध्ये आज ७ ते १६ वयोगटातील सुमारे ७० मुले/मुली दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत शिकायला येत आहेत. अक्षर-अंक ओळख आणि याचबरोबर मूल्य-शिक्षण यांवर भर असलेल्या शाळेत आम्ही गेल्या वर्षभरात विविध प्रयोग करून पहिले.
यांपैकी सगळ्या पहिला आणि मोठा प्रयोग म्हणजे एकाही विद्यार्थी-विद्यार्थिनीला रागवायचे नाही आणि  मारायचे तर त्याहून नाही. मुळातच शिक्षक म्हणला कि तो आपल्याला मारणारच हि भीती या सगळ्या चिमुरड्यांच्या मनात अगदी घट्ट घर करून बसलेली आहे. काही जणांच शाळा सोडण्याच कारणच ते आहे. अश्यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये विश्वासाचे आणि त्याहूनही प्रेमाचे नाते निर्माण होत नाही. मात्र हे सर मारत नाहीत हे लक्ष्यात आल्यावर सगळेच मनमोकळेपणे आमच्याशी बोलू लागले आणि एक जिव्हाळ्याचे नाते आमच्यात निर्माण झाले इतके कि ४थित शिकणाऱ्या एका छोट्या चिमुरडीने, ”सर यापुढे मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. कट्टी” अस एक पत्र मला दिल आणि दुसऱ्या दिवशी माझ्याशी परत बोलायला लागली.
या शाळेत कोणताही शिक्षक उभे राहून शिकवत नाही तर त्यांच्यातच बसून गप्पा मारत गोष्टी शिकवल्या जातात यामुळे शिक्षकाच्या उजव्या बाजूला एक जण तर डाव्या बाजूला दुसरा टेकून बसलाय, तर पाठीशी पाठ लाऊन आणखी कोणीतरी काहीतरी पाठ करण्याचा नाहीतर वाचण्याचा प्रयत्न करतोय अस चित्र आमच्या शाळेत नेहमीच दिसत.
पाठांतरावर शाळांमधून खूप भर दिला जातो मात्र अनेकदा हे पाठांतर आणि घोकंपट्टी यात बराच फरक आहे. घोकून घोकून गोष्टी पाठ होतात मात्र त्या अनेकदा समजलेल्याच नसतात. शाळांमध्ये सगळ्यांना ‘अ आ इ ई’ पासून ते ‘अं अः’ आणी ‘क ख ग’ शिकवलं जात नाही तर घोकून घोकून पाठ करवल जात. यामुळे मुलांना ‘अ आ इ ई’ म्हणता येत, लिहिता पण येत पण अ पासून सुरु न करता एकदम ‘ल’ किंवा तश्याच दुसऱ्या शब्दावर बोट ठेऊन ते वाचायला सांगितलं तर ते मात्र त्यांना जमत नाही. अगदी ७वि, ८वित जाणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनीना वाचता येत नाही याच मुख्य कारण हेच आहे. याचसोबत ८विपर्यन्त विद्यार्थ्याला नापास करायचं नाही या शासनाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याने/विद्यार्थिनीने जर पेपर लिहिला नसेल तर तो त्यांच्या शिक्षकाला लिहावा लागतो त्यामुळे आता परीक्षा म्हणजे शिक्षक फळ्यावर प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहून देतात आणि बाकीच्यांनी ते फक्त त्यांच्या उत्तर पत्रिकेत उतरवून घ्यायचं असत.
यांना वाचायला शिकवताना आम्ही सुरुवातीला ‘क ख ग’ शिकवत असताना एखाद्या शब्दावर मधेच बोट ठेवून ते विचारायला सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल होताना दिसू लागला. मग परत ‘क का कि कु’ आणि मग ‘ख खा’ वर न जाता आधी ‘का खा गा’ हे शिकवले नंतर ‘कि खि गि’ शिकवेल व तसेच इतर शब्दांचे करत गेलो. यावेळी प्रत्तेक प्रसंगी त्यांना गोष्टीची पुस्तके वाचायला दिली व आपल्याला येत असलेल्या शब्दांच्या खाली एक रेष मारून तो शब्द मोठ्याने म्हणायचा असे शिकवले.ज्यांना पूर्वी अगदी काहीच वाचता येत न्हवते अशी मुले/मुली आता हळू हळू का होईना पण वाचायला लागली आहेत.
याचबरोबर कोणताही निर्णय स्वतः न घेता प्रत्येक प्रसंगी त्यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. याच अगदी छोट उदाहरण म्हणजे gathering नंतर बक्षीस द्याव कि नाही यावर त्यांच्याशीच चर्चा करण्यात आली. द्याव म्हणणारे आणि नाही द्याव अस म्हणणारे दोन गट झाले. मग प्रत्येकाने स्वतःच मत व्यक्त केल मग अगदी मुळात तुम्ही आमच्यासाठी इतका खर्च केल्यावर उगीच बक्षिसावर पैसे वाया घालवू नका पासून ते सगळ्यांनी मेहनत घेतली आहे त्यामुळे एकालाच बक्षीस नको, मग द्यायचं असेल तर सगळ्यांना द्या. यात परत उपयोगात आणता येईल अश्या वस्तू द्या असे विचार पुढे येऊ लागले. या चर्चेतून मग मतदान म्हणजे काय? ते का होत? त्याचे फायदे काय? हे त्यांना समजावून सांगितले गेले व या प्रश्नी मतदान घेण्यात आले. मात्र हे करताना बहुमताच्या बाजूने निर्णय न देता जोपर्यंत सार्वमत होत नाही तोपर्यंत निर्णय देण्यात आला नाही. मग त्यांनी एकमेकांना समजावले व सरते शेवटी मग सगळ्यांना वही, पेन, पेन्सिल, शार्पनर व खोडरबर देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.
यासारख्या अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून शाळा घडत आहे, शाळेतली मुल/मुली घडत आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही देखील…
शाळेची सुरुवात हि एखादे कार्टून अथवा छोटी फिल्म पाहून रोज केली जाते तर शेवट गाण्याने होतो. मध्येच जर सगळ्यांना मूड खेळण्याचा असला तर अभ्यास बाजून ठेवून खेळ खेळले जातात.
शिक्षणा विषयी या मुला/मुलींमध्ये प्रेम निर्माण व्हावे हा जरी या शाळेचा उद्देश असला तरी मूल्य शिक्षण हा अत्यंत महत्वाचा गाभा आमच्या शाळेचा आहे ज्यावर २ तासातला सर्वाधिक वेळ खर्च केला जातो. मुळातच कचरा वेचक मुला/मुलीमध्ये स्वच्छते विषयी जाणीव नसते. सतत घाणीत राहिल्याने वारंवार आजारी पडणे तसेच आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. सुरुवातीच्या काळातच माझा मित्र डॉ. भूषण याने त्यांच्या वाढदिवसाला शाळेत celebrate करताना मुलांना स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले व स्वच्छ हात-पाय कसे धुवावे ते शिकवले. यानंतर आम्ही शाळेत येतान व परत गेल्यावर सगळ्यांनी स्वच्छ हात पाय धुतले पाहिजेत असे सांगितले. आता सगळी जण स्वच्छ हात-पाय धुवून शाळेत येतात इतकेच नाही तर दिवसभर शक्य असेल तेव्हा स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात.
अनेक नवीन नवीन अनुभवातून आम्ही शिकत आहोत. मात्र हे सहज झाल नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलांना एक महिन्याची सुट्टी देण्यात आली. यानंतर ४०च्या वर विद्यर्थ्यांची गेलेली संख्या संख्या एकदम २/३ विद्यार्थ्यांवर आली. यानंतर सगळे पूर्ववत सुरु होण्यात बराच काळ गेला.
आज शाळेची जी दोन केंद्र सुरु आहेत यात एक मुलभूत फरक आहे. एका केंद्रावर जवळ जवळ सगळी कचरा वेचणारी मुले/मुली येतात तर दुसर्या केंद्रावर कनिष्ट मध्यम वर्गातली पण बहुतांश शाळेत जाणारी मुले/मुली येतात. सुरुवातील काही प्रसंगात जेव्हा यांना एकत्र करण्यात आले. तेव्हा कचरा वेचणारी मुले/मुली यांच्यात जाऊन बसली नाहीत. ती दूर दूर राहत होती. हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही हि भावना यांच्या मनात घर करून राहिली आहे. तर दुसरीकडे हि इतर मुले देखील त्यांच्या जवळ जाण्यास घाबरत होती. यानंतर आम्ही त्यांना आठवड्यातून किमान एकदा एकत्र आणायला लागलो. हळू-हळू कचरा वेचक मुले/मुली यांच्यात येऊन बसायला लागली इतरांनी देखील त्यांना आपल्यात सामावून घेतले. आज या सगळ्यांची खूप छन गट्टी जमली आहे.
याचसोबत आता जळगावातील संस्थेशी जोडलेले काही व्यावयासिक, उच्चभ्रू लोकांना आम्ही त्यांनी दर रविवारी त्यांच्या मुलांना घेऊन शाळेत यावे व या सगळ्यांसोबत वेळ घालवावा असे आम्ही सांगत आहोत. यामुळे कचरा वेचक मुला/मुलींमध्ये confidence वाढायला मदत होईल तसेच समाजातील उच्चभ्रू समाजाला देखील या लोकांच्या सुख-दुक्खाशी समरस होतील.
हळू-हळू गोष्टी बदलत आहेत. या संपूर्ण प्रवासात अनेक लोकांनी आम्हाला साथ दिली. अनेकांनी मार्गदर्शकच्या भूमिकेतून तर अनेकांनी आर्थिक सहाय्य करून आम्हाला मदत दिली. माझ्यासोबत शिकवणारे समाधान पवार आणि समीर तडवी अत्यंत अल्प मानधनावर आज हि संपूर्ण व्यवस्था स्वतःची समजून त्यासाठी झटत आहेत. या सगळ्यांच्या मदतीने, मार्गदर्शनाने आज सुमारे ७० मुला/मुलींचा आमचा एक मोठा परिवार तयार झाला आहे. आणि त्यांत दर आठवड्यात नवीन भर पडते आहे.
समांतर व्यवस्था निर्माण करणे हे आमचे नक्की उद्दिष्ट नाही तर आहे हि व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पुढील शैक्षणिक वर्षात तांबापुरा भागातील महानगरपालिका शालेसोबत शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मात्र आज आम्ही अनेक आर्थिक अडचणींमुळे ताम्बापुरातील देखील एकाच भागात मर्यादित आहोत. अजून असे इतर भाग, वस्त्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. एक खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण सगळ्या गोष्टी जमून येतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. कोणीतरी म्हणलेच आहे ना,
‘मंजिले तो मिल हि जायेगी भटकतेही सही,
गुमराह तो वो हे जो घर से निकले हि नही!!’

-अव्दैत..

पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील शांतता आणि लोकशाही सुद्धृड करण्यासाठी १९९३ साली स्थापना करण्यात आलेल्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी या फोरमशी मी गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ जोडलेलो आहे. या फोरमचा महाराष्ट्राचा सह-सचिव म्हणून मी गेल्या काही महिन्यापासून काम करत आहे. मुळातच भारत-पाकिस्तान यांच्यातील व्देष-गैरसमज यांची करणे काय? याची सुरुवात कशी झाली? यावर उत्तर शोधता येईल का? तसेच फोरमचे गेल्या २० वर्षातील काम याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेखातून केला आहे. या लेखातील काही मुद्यांबद्दल मतभेद असू शकतात मात्र दोन्ही देशातील लोकशाही आणि शांतता, मैत्री सुद्धृड करण्याच्या फोरमच्या प्रमुख उद्देशाबद्दल मतभेद नसतील हि अपेक्षा.

-अव्दैत दंडवते. 

15 ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला मात्र स्वताचे दोन तुकडे पाडूनच. १७ ऑगस्ट ला भारताची फाळणी लोकांच्या समोर आली आणि भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्राचे नकाशे जगासमोर आले. यानंतर या देशाने कधीही पहिला न्हवता असं नरसंहार अनुभवला. लाखो-करोडो लोकांची आयुष्य नकाश्यावर मारलेल्या पेन्सिलीच्या काही उभ्या-आडव्या रेषांनी कायमची बदलून गेली. स्वातंत्र्य मिळवण्याची अनाकारण घाई म्हणा, सत्तेची लालसा म्हणा किंवा हिंदू-मुस्लिम व्देष कायमचा संपवण्याचा एक अभूतपूर्व पण असफल प्रयत्न म्हणा जगाच्या नकाश्यावर भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे जन्माला आली होती.

या फाळणीचा संपूर्ण दोष (भारतीयानुसार) आणि श्रेय (पाकिस्तांनी नागरीकांनुसार) ज्यांच्या माथी मारल गेलं त्या दोन्ही व्यक्ती पुढच्या दोन वर्षात निघून गेली होती. एका अहिंसेच्या प्रेषिताची बंदुकीच्या तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर दुसरा आजारपणाने खंगत जाऊन शेवटी हे जग सोडून निघून गेला.

मात्र गोष्ट इथेच संपत नाही. यांनतर सुरु झालेला शह-काटशह, कट-कारस्थान यांचा कधीही न संपणारा खेळ.

एकीकडे भारताने लोकशाही, सर्वधर्मसमभाव हि धोरणे स्वीकारली तर दुसरीकडे ज्या मुस्लिम धर्मियांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला होता त्याला अपरिहार्यपणे मुस्लिम धर्मांधता स्वीकारवी लागली. एकीकडे भारतात प्रत्तेक वर्षागणिक लोकशाही अधिकाधिक सुद्धृड होत गेली तर दुसरीकडे मात्र पाकिस्तानात मात्र राष्ट्राध्यक्षांचे खून आणि धर्माच्या आधारावर सुरुवात झालेली आणि मानवी-मुलभूत अधिकाराचे हनन करणारी लष्करी हुकुमत यामुळे लोकशाही कधी रुजलीच नाही किंबहुना ती कधी रुजू दिलीच गेली नाही….

कोणत्याही देशाला प्रगती करण्यासाठी समोर ध्येयाची आवश्यकता असते. पाकिस्तानात ठरवून भारताचा द्वेष हे ध्येय लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न अग्गदी ठरवून सुरुवातीपासून केला गेला याची सुरुवात सर्वप्रथम इतिहासाचे विकृतीकारणापासून करण्यात आली. कोणत्याही देशाच्या जडण-घडणीत इतिहासाचा खूप मोठा वाटा असतो. मात्र पाकिस्तानचा इतिहास काय? असा प्रश्न पाकिस्तानातील इतिहासकारांना पडला कारण 15 ऑगस्ट १९४७ पूर्वी पाकिस्तान नामक देशच अस्तित्वात नसल्याने या देशाला स्वतंत्र असा इतिहासच न्हवता. मात्र यावर उत्तर शोधण्यात आले आणि मग अलाउद्दीन खिलजी, बाबर यांच्या काळात झालेला मुस्लिम राष्ट्राचा / पाकिस्तानचा उदय, औरंगजेबाच्या काळात झालेला त्याचा विस्तार, इंग्रजांचे राज्य, स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी जागृत झालेली भावना आणि मग पाकिस्तानची निर्मिंती असा पाकिस्तानचा इतिहास लिहिण्यात आला. यामध्ये मग हिंदू बहुल लोकसंख्या असलेला भारत कसा वाईट आणि त्याने आपल्या अधिकारांचे हनन वर्षानुवर्षे कसे केले याचा विकृत इतिहास लहानपणापासून मुलांना शिकवून त्यांच्या मनात भारताबद्दल व्देष कायम राहील व तो सतत वाढत जाईल याची काळजी घेतली गेली.

दुसरीकडे भारतीयांच्या मनावर फाळणी, त्यांनतर झालेल्या नरसंहारास मुस्लिम धर्मीय आणि त्यांनी पाकिस्तानची मागणी कशी कारणीभूत आहे हे थासण्याची सुरुवात भारतातील धर्मांध शक्तींनी सुरु केली. भारतातील ठराविक लेखकांनी पाकिस्तानांत हिंदुंवर कसे अत्याचार केले जातात याची मीठमसाला लाऊन वर्णन केलेली पुस्तके सत्यकथेच्या नावाखाली खपवली. संपूर्ण जगात पाकिस्तान हाच कसा भारताचा शत्रू आहे आणि पाकिस्तानकडूनच भारताला कसा धोका आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला गेलं. पाकिस्तानचा “कट्टर प्रतीस्पर्धी, पारंपारिक प्रतिस्पर्धी” असा सतत होणारा उल्लेख याचाच एक भाग आहे.

मात्र वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध सहजासहजी सुटत नाहीत. एका देशात, एका शहरात राहणारे अनेक लोकं एका रात्रीत वेगळे झाले. मात्र त्यांची परस्परांसंबंधीची ओढ कमी झाली न्हवती जर हे लोकं एकमेकानंना भेटत राहिले तर बऱ्याच प्रयत्नांती घडवून आणलेला हा डाव उधळून लागण्याची शक्यता होती. म्हणुनच या दोन्ही देशातील सामान्य नागरिकांचा एकमेकांशी असलेला संबंध तोडण्यात आला. ते एकमेकांना भेटू शकणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. VISA चे नियम अत्यंत कठोर करण्यात आले त्यातील क्लिष्टता वर्षागणिक आणखी वाढवण्यात आली.

आज TV सुरु केला कि आपल्याला जगभरातील channels दिसतात मात्र पाकिस्तानातील एकही channel भारतात दिसत नाही. पाकिस्तानातील सद्य स्थिती लोकांसमोर येत राहील असे एकही news channel तसेच वृत्तपत्र भारतात येत नाही. पाकिस्तानात देखील एकही भारतीय channel दिसत नाही तसेच एकही वृत्तपत्र येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी आहे.

भारतीय आणि पाकिस्तानातील संस्कृतीत, राहणीमानात फारसा फरक नाही. सिनेमा-सिरीयल यांवर एकूण जनमाणसाचा, त्यांच्या राहणीमानाचा प्रभाव असतो. मात्र या गोष्टी लोकांसमोर येऊ नये यासाठीच हे प्रयत्न करण्यात आले.

दोन्ही देशातील व्देष वर्षानुवर्षे वाढतच गेला आहे. दोन्ही देश त्यांच्या देशातील वाढत्या दहशतवादाला एकमेकांना दोषी मानतात. चर्चा-मैत्री याने हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असं विचारच फारसा कोणी केला नाही. या काळात दोन्ही देशांनी अनेक चुका केल्या. कदाचित भारताने १० चुका केल्या असतील तर पाकिस्तानने १२ चुका केल्या हे देखील एक वेळ मान्य करता येईल. असे असले तरी एक वेळ अशी येते ज्यावेळी झालेल्या चुका विसरून पुन्हा नव्याने डाव मांडण्याची गरज असते.

भारत-पाकिस्तानातील सामान्य जनेतेला युध्द नकोय तर मैत्री हवीये या दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेकांबद्दल असलेले संशय, गैरसमज दूर करायचे असतील तर त्यांनी एकमेकांना भेटायला हवे, एकमेकांच्या देशाला भेटी द्यायला हव्यात आणि दोन्ही देशांमधील शांतात-लोकशाही सुद्धृड करण्यासाठी चर्चा करायला करायला हवी या विचारातून दोन्ही देशातील सामाजिक-मानवी हक्क कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलावंत यांनी केली  १९९३ साली पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रॅसी या फोरमची स्थापन केली….

 

क्रमश….